Tuesday, March 22, 2016

प्राजक्ताचा सडा

पहाटेचे चार वाजले असावेत. बाल्कनी मधून येणाऱ्या वाऱ्याने हलणारा पडदा, समोर दूरवर पसरलेले चहा-कॉफीचे मळे, चंद्रप्रकाशात अजूनच सुंदर दिसणारी समोरची झोपडी, बाजूच्या बेड वर तृप्त होऊन झोपलेली तू आणि लॅपटॉपच्या कीबोर्ड वर खडखड करणारा मी…

त्या दिवशी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझ्या डोळ्यात एक ओळखीची छटा दिसली. म्हणजे हा चेहरा कदाचित आपण पहिल्यांदा बघत आहोत, पण त्या आतला माणूस खूप ओळखीचा आहे. नकळत तुझ्या मागे ओढल्यासारखा चालायला लागलो, तुझ्या नकळत तुझा फोटो काढायचा प्रयत्न करत असताना अचानक तू वळून पाहिलस आणि तो फोटो काढायचा राहूनच गेला…

शमा, अगदी नावाप्रमाणे आहेस तू. जेवढी वरवर शांत वाटतेस तेवढीच आतून अशान्त. मनातली सगळी तगमग आतमध्ये खोल दाबून ठेऊन चेहऱ्यावर जराही काही न दाखवणारी. पण कशी कुणास ठाऊक मला तुझी ती तगमग जाणवली. त्या नंतर गेले तीन दिवस मग माझ्या फोटोग्राफीसाठीची भटकंती असेल नाहीतर तुझ्या नेहमीच्या जागेवर जाऊन तासन् तास गप्पा मारत बसण. विषयाला कोणतीच बंधन नव्हती आणि वेळ मात्र कमी पडत होता. भेटण्या आधीच आपल्या वाटा परत वेगळ्या होणार आहेत याची जाणीव असल्याने असेल कदाचित, पण सगळ कस समजूतदारपणे चालल होत. काल रात्री तुला हॉटेल वर सोडताना पाय निघतच नव्हता. कसतरी तुला बाय केल आणि सगळा धीर एकवटून निघालो तिथून, कदाचित अजून काही क्षण थांबलो असतो तर मात्र निघण अवघड होऊन बसल असत. तुझ्या मनातली ओढ मला जाणवत होती, तुझ्या डोळ्यातली ती आर्जव मला देखील थांबायला भाग पाडत होती आणि म्हणूनच तो क्षण येण्याआधीच तिथून निघालो मी. हॉटेल वर आलो आणि तसाच शॉवर खाली जाऊन उभा रहिलो. त्या पाण्याने अंग धुउन निघाल पण मनातले विचार मात्र धुउन टाकता येत नव्हते. फ्रेश होऊन बाल्कनी मध्ये आलो, किती वेळ तिथे बसून होतो माहित नाही पण त्या नीरव शांततेने मनातला बराचसा कोलाहल कमी केला होता.

अचानक डोअरबेलच्या कर्कश्य आवाजाने तंद्री मोडली. दार उघडून पाहतो तो समोर तू, क्षणभर कळलेच नाही कि हे सत्य आहे का भास. "जागो, ई स्वोप्नो ना हाया" डोळ्यासमोर चुटकी वाजवून म्हणालीस अन् तुझ्या हसण्याने ती सबंध खोली भरून टाकलीस. जस जशी रात्र वाढत होती तस तशी तुझी बडबड पण वाढत होती. तुला शाळेत मिळालेलं पाहिलं बक्षीस, तुझ्या आईच्या हाताचा "मुरी घोन्तो", चेन्नई मधली तुझी मैत्रीण, तुझा जुना बॉयफ्रेंड, दुबई एअरपोर्ट वर जागून काढलेली रात्र, शेजार्यांची स्कूटर पाडल्यावर खाल्लेला मार, तू होस्टेलला राहायला गेल्यावर तुला आलेला ताप. तुझी ती बडबड माझ्यासाठी नव्हतीच, मी फक्त तिथे होतो म्हणून, तुझ्या कडू-गोड आठवणींची तू स्वतापाशीच उजळणी करत होतिस. तुझ्या त्या भूतकाळात हरवलेल्या डोळ्यात मी माझा वर्तमान काळ हरवत होतो. तुझा गव्हाळ वर्ण, किंचित चॉकलेटी झाक असलेले डोळे, सरळ नाक, लिपस्टिक मुळे अजूनच सुंदर दिसणारे ओठ अन् मधोमध खड्डा असलेली जीवणी.

अचानक बोलायची थांबलीस तू मिनिटभर आणि मग सोसाट्याचा वारा जाऊन त्याची जागा पावसाच्या सरींनी घ्यावी त्याप्रमाणे अचानक सूर बरसू लागले. मी तुझ्या मांडीवर डोक ठेऊन डोळे मिटून ते ऐकत होतो. तू काय गात आहेस हे मला कळत नव्हत, पण जे काही होत ते खूप आत पर्यंत पोचत होत. माझ्या केसातून तुझी फिरत असलेली बोट आणि तेव्हाच जाणवलेला तुझ्या ओठांचा माझ्या ओठांवर झालेला तो ओलसर स्पर्श. आपल्यातल उरल सुरल अंतर देखील आता गळून पडल होत. एखाद्या प्राजक्ता सारखी बहरली होतीस तू आणि माझ्यावर मुक्तहस्ते उधळण करत होतीस फुलांची आणि मी माझ्या दोन हातानी त्यातलं जमेल तेवढ वेचायचा प्रयत्न करत होतो.

उद्या इथून जाताना फक्त एवढच असेल माझ्या सोबत, तुझा न काढलेला फोटो, कानात घुमणारा तुझा आवाज आणि प्राजक्ताचा सडा…