Tuesday, March 22, 2016

प्राजक्ताचा सडा

पहाटेचे चार वाजले असावेत. बाल्कनी मधून येणाऱ्या वाऱ्याने हलणारा पडदा, समोर दूरवर पसरलेले चहा-कॉफीचे मळे, चंद्रप्रकाशात अजूनच सुंदर दिसणारी समोरची झोपडी, बाजूच्या बेड वर तृप्त होऊन झोपलेली तू आणि लॅपटॉपच्या कीबोर्ड वर खडखड करणारा मी…

त्या दिवशी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझ्या डोळ्यात एक ओळखीची छटा दिसली. म्हणजे हा चेहरा कदाचित आपण पहिल्यांदा बघत आहोत, पण त्या आतला माणूस खूप ओळखीचा आहे. नकळत तुझ्या मागे ओढल्यासारखा चालायला लागलो, तुझ्या नकळत तुझा फोटो काढायचा प्रयत्न करत असताना अचानक तू वळून पाहिलस आणि तो फोटो काढायचा राहूनच गेला…

शमा, अगदी नावाप्रमाणे आहेस तू. जेवढी वरवर शांत वाटतेस तेवढीच आतून अशान्त. मनातली सगळी तगमग आतमध्ये खोल दाबून ठेऊन चेहऱ्यावर जराही काही न दाखवणारी. पण कशी कुणास ठाऊक मला तुझी ती तगमग जाणवली. त्या नंतर गेले तीन दिवस मग माझ्या फोटोग्राफीसाठीची भटकंती असेल नाहीतर तुझ्या नेहमीच्या जागेवर जाऊन तासन् तास गप्पा मारत बसण. विषयाला कोणतीच बंधन नव्हती आणि वेळ मात्र कमी पडत होता. भेटण्या आधीच आपल्या वाटा परत वेगळ्या होणार आहेत याची जाणीव असल्याने असेल कदाचित, पण सगळ कस समजूतदारपणे चालल होत. काल रात्री तुला हॉटेल वर सोडताना पाय निघतच नव्हता. कसतरी तुला बाय केल आणि सगळा धीर एकवटून निघालो तिथून, कदाचित अजून काही क्षण थांबलो असतो तर मात्र निघण अवघड होऊन बसल असत. तुझ्या मनातली ओढ मला जाणवत होती, तुझ्या डोळ्यातली ती आर्जव मला देखील थांबायला भाग पाडत होती आणि म्हणूनच तो क्षण येण्याआधीच तिथून निघालो मी. हॉटेल वर आलो आणि तसाच शॉवर खाली जाऊन उभा रहिलो. त्या पाण्याने अंग धुउन निघाल पण मनातले विचार मात्र धुउन टाकता येत नव्हते. फ्रेश होऊन बाल्कनी मध्ये आलो, किती वेळ तिथे बसून होतो माहित नाही पण त्या नीरव शांततेने मनातला बराचसा कोलाहल कमी केला होता.

अचानक डोअरबेलच्या कर्कश्य आवाजाने तंद्री मोडली. दार उघडून पाहतो तो समोर तू, क्षणभर कळलेच नाही कि हे सत्य आहे का भास. "जागो, ई स्वोप्नो ना हाया" डोळ्यासमोर चुटकी वाजवून म्हणालीस अन् तुझ्या हसण्याने ती सबंध खोली भरून टाकलीस. जस जशी रात्र वाढत होती तस तशी तुझी बडबड पण वाढत होती. तुला शाळेत मिळालेलं पाहिलं बक्षीस, तुझ्या आईच्या हाताचा "मुरी घोन्तो", चेन्नई मधली तुझी मैत्रीण, तुझा जुना बॉयफ्रेंड, दुबई एअरपोर्ट वर जागून काढलेली रात्र, शेजार्यांची स्कूटर पाडल्यावर खाल्लेला मार, तू होस्टेलला राहायला गेल्यावर तुला आलेला ताप. तुझी ती बडबड माझ्यासाठी नव्हतीच, मी फक्त तिथे होतो म्हणून, तुझ्या कडू-गोड आठवणींची तू स्वतापाशीच उजळणी करत होतिस. तुझ्या त्या भूतकाळात हरवलेल्या डोळ्यात मी माझा वर्तमान काळ हरवत होतो. तुझा गव्हाळ वर्ण, किंचित चॉकलेटी झाक असलेले डोळे, सरळ नाक, लिपस्टिक मुळे अजूनच सुंदर दिसणारे ओठ अन् मधोमध खड्डा असलेली जीवणी.

अचानक बोलायची थांबलीस तू मिनिटभर आणि मग सोसाट्याचा वारा जाऊन त्याची जागा पावसाच्या सरींनी घ्यावी त्याप्रमाणे अचानक सूर बरसू लागले. मी तुझ्या मांडीवर डोक ठेऊन डोळे मिटून ते ऐकत होतो. तू काय गात आहेस हे मला कळत नव्हत, पण जे काही होत ते खूप आत पर्यंत पोचत होत. माझ्या केसातून तुझी फिरत असलेली बोट आणि तेव्हाच जाणवलेला तुझ्या ओठांचा माझ्या ओठांवर झालेला तो ओलसर स्पर्श. आपल्यातल उरल सुरल अंतर देखील आता गळून पडल होत. एखाद्या प्राजक्ता सारखी बहरली होतीस तू आणि माझ्यावर मुक्तहस्ते उधळण करत होतीस फुलांची आणि मी माझ्या दोन हातानी त्यातलं जमेल तेवढ वेचायचा प्रयत्न करत होतो.

उद्या इथून जाताना फक्त एवढच असेल माझ्या सोबत, तुझा न काढलेला फोटो, कानात घुमणारा तुझा आवाज आणि प्राजक्ताचा सडा…

Monday, August 11, 2014

मी, ती आणि पाऊस... भाग-२

ए चल ना रे, प्लीज... माझ्यासाठी चल!” ती खूप विनवण्या करत होती. पण मी ठाम होतो. ऑफिस मधून दमून भागून आल्यावर मला खरतर कुठेही जायची इच्छा होत नव्हती. विशेषत: बाहेर पाऊस चालू असताना आईस्क्रीम खायला जायची तर नाहीच नाही. तिने सगळे मार्ग वापरून पहिले. लाडाने, प्रेमाने, चिडून पण माझा नकार ठाम आहे म्हंटल्यावर तिने हुकमी एक्का काढला. या डोळ्यांसमोर माझं काहीच चालत नाही. माझ्या तोंडून होकार कधी गेला ते मलादेखील समजल नाही.
आईस्क्रीम घेऊन झाल्यावर म्हणाली,”चल कुठेतरी फिरून येऊ. घरी जायची इच्छा होत नाहीये.” मग चांगल तासभर निरुद्देश भटकून परत घराकडे यायला निघालो. एव्हाना ट्राफिक कमी झालं असल तरी सिग्नल सुरु होते. एका सिग्नलला थांबलेलो असताना अचानक एका मुलाने गजरे घेणार का विचारलं, दे म्हणालो. त्या मंद सुगंधाने खूप छान वाटू लागलं. नेमकं त्याच वेळी रेडिओ वर रुना लैलाचं “रंजिशे हि सही लागलं....” दोघेही तल्लीन होऊन गाणं ऐकत होतो. त्याच तंद्रीत घरी पोचलो. दमला असशील न तू, फ्रेश होऊन ये मी तोवर कॉफी करते. पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी लगेच आत पळालो. शॉवर घेतल्यावर खूप हलकं वाटू लागल. मगापर्यंत माझ्याही नकळत कसलं तरी ओझं, दडपण मनावर होत.
कॉफी घेऊन गच्चीत गेलो, दोघेही शांत. ती शांतता त्या कॉफी पेक्षाही कडवट वाटत होती.वाटत होत काहीतरी चुकलय, काहीतरी हरवलंय. पण ते हरवलं आहे हेच आपल्याला अजून कळाल नाहीये. अचानक तिच्याकडे लक्ष गेलं तर तिच्या डोळ्यात अश्रू. मी विचारलं, “अग काय झालं अचानक तुला? आत्ताच तर तुझ्या मनासारख झालं सगळ आईस्क्रीम आणि मग नंतर फिरून आलो.” ती म्हणाली, ”बाबा! आईची आठवण येतेय रे...”. पायाच्या बोटाला जखम झालेली असावी आणि आपल्याच नादात चालताना अचानक तिथेच ठेच लागून ती कळ थेट मेंदूत जावी, अस काहीतरी झालं. सकाळपासूनची हुरहूर, एक विचित्र प्रकारची अस्वस्थता, चिडचिड या सगळ्याच कोड अचानक सुटल.शांतपणे तिला जवळ घेऊन थोपटत राहिलो.
उणीपुरी २० वर्ष होत आली तरी अजूनही सगळं काल-परवा सारखाच वाटत होत. तिच्या बरोबर जगलेला प्रत्येक क्षण आजही जसाच्या तसा स्मरणात आहे. तिचं हसणं, तिचं रुसणं, तिचा राग, तिचं प्रेम आणि तिचे डोळे. वाटतं आत्ता सुद्ध्या ती तशीच त्या अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे पाहत आहे माझ्या समोर बसून. अजूनही आठवते ती संध्याकाळ, ती कॉफी, तिचा तो स्पर्श आणि तिचा तो प्रश्न, “तू अजूनही माझ्या बोलण्याची वाट पाहत आहेस?”

Tuesday, July 31, 2012

मी, ती आणि पाउस...

मी असेन तेव्हा ७-८ वर्षांचा आई बरोबर शाळेतुन घरी येत होतो. फार मोठा पाउस नसला तरी अंग भिजण्याएवढा नक्की होता. एका हाताने छत्री आणि दुसरया हाताने मला पकडून ठेवताना तिची होणारी  धांदल सहज दिसत होती. पण मला मात्र पावसात खेळायचं होतं, माझी तीच मस्ती सुरु असताना मी एक छानपैकी दंडवत घातला रस्त्यात, रस्त्यामधला बराचसा चिखल आता मझ्या अंगावर अणि कपड्यांवर आला होता आणि माझं ते ध्यान बघून टपोरया डोळ्यांची, दोन वेण्या घातलेली एक मुलगी हसत होती. भरिस भर म्हणून आईच्या हातचे २ रट्टे पण बसले पाठीत. झालेला तो प्रचंड अपमान सहन करत, पण डोळ्यातून पाणी न येऊ देण्याचे खुप कष्ट घेत कसंबसं घर गाठलं होतं... खुप दुष्ट वाटली होती ती तेव्हा...

आज शिकवणीला जाताना खुप भीती वाटत होती, एकतर उशीर झालाच होता आणि त्यात गृहपाठ पूर्ण नव्हता. तरी नशीब आज आजी ओरडली दादाला, म्हणून त्याने त्याची सायकल तरी दिली होती. नाहीतर त्याची सायकल चालवायला मिळणं तर दूर हात लावायला पण द्यायचा नाही. कसाबसा अर्ध्या रस्त्यात पोचलो असेल तेवढ्यात पाउस सुरु झाला, कशीतरी सायकल बाजूला घेतली आणि एका घराच्या आडोशाला उभा राहिलो. २-४ मिनिटं झाली असतील तेवढ्यात ती येताना दिसली. अगदी तशीच टपोर्या डोळ्यांची, दोन वेन्य घालणारी... म्हणाली, "चल माझ्याकड़े छत्री आहे एकत्रच जाऊ". एकतर उशीर झाला होता आणि कुणी मित्र नव्हते म्हणून तयार झालो मी जायला. नाहीतर त्यांना निमित्तच मिळालं असत चिडवायला. कुठलाही मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलले की लगेच चिडवणं चालू... आपल्याला नाही आवडत असलं काही. तिच्याशी काय बोलायचं हा एक प्रश्नच होता, तेवढ्यात शेजारून जाणारया गाडीने खड्यामधे साचलेलं पाणी आमच्या अंगावर उडवलं आणि तंद्री मोडली आणि काही कळायच्या आत ती गाड़ी निघून पण गेली होती... मी तिच्याकडे पहिलं तर तिच्या डोळ्यात एकूण एक ढग जमा होऊन कोणत्याही क्षणी पाउस सुरु होइल अशी अवस्था. मला तर सुचेचना काय बोलावं, काहीतरी बोलायचं म्हणून म्हणालो, "अगं कपडे धुतले की जाईल डाग". माझ्या त्या वाक्यासरशी तिचा हुंदका बाहेर पडला, म्हणाली, "आज माझा वाढदिवस आहे म्हणून नविन ड्रेस शिवून आणला होता कालच आणि आजच तो ख़राब झाला"... खुप हळवी वाटली होती ती तेव्हा...

त्या दिवशी सकाळपासुनच देव बहुतेक माझ्या मागे हात धुवून लागला होता. आता मला सांगा कॉलेजमधे कुणी अभ्यासाच्या वह्या,पुस्तकं, आय-कार्ड अशा गोष्टि नेतं का? आणि किमान सिनियर कॉलेज मधे तर नक्कीच नाही. तर झालं अस की त्या दिवशी नेमके गेट वर प्रिंसिपल उभे आणि प्रत्येकाचे आय-कार्ड तपासत होते. कॉलेज मधे जायचा तर प्रश्नच नव्हता, मग राहता राहिलं कॉर्नर वरच्या अण्णाचं हॉटेल, पहिलं तर सगळा ग्रुप तिकडेच पडीक, टेबल वर बसून टाइमपास करत दिवस घालवायचा नव्हता म्हणून पेटपूजा करता करता पिक्चरचा प्लान ठरला, पण त्याला अजुन खुप वेळ होता म्हणून तिथेच टी-पी करत बसलो होतो. तेवढ्यात वर्गातला एक स्कॉलर तिथे आला ते माझ्या उरलेल्या दिवसाची पण वाट लावायला. म्हणाला सरांनी स्टाफरूम मधे बोलावलं आहे, जर्नल सबमिट केलं नाही म्हणून. साला म्हणजे हा माझे ४ तास खाणार पुढचे, कुठला पिक्चर आणि कसलं काय, पुढचे ३-३.३० तास आधि त्यांच लेक्चर ऐकण्यात अणि नंतर बधिर झालेल डोकं ठिकाणावर आणण्यात गेले. सगळ्या मित्रांनी नावाला जागुन टांग मारली होती अणि पिक्चरला गेले होते. त्यापैकी कुणी परत इकडे फिरकेल अशी शक्यता पण नव्हती. खुप भूक लागली होती म्हणून परत अण्णाच्या हॉटेल वर आलो तर ते पण बंद झालं होतं. बाइक काढून घरी निघालो होतो तेव्हढ्यात बस स्टॉप वर ती दिसली. म्हंटल चल मी पण घरीच निघालोय सोडतो तुला... विचारलं कॉफी प्यायची का? तर चालेल म्हणाली. चला तितकीच कुणाची तरी सोबत. तसंही मला एकट्याला बसून खायला फारसं आवडत नाही. पण पुढच्याच मिनिटाला जो पाउस चालू झाला ते अगदी धो धो कोसळायला लागला, कशी-बशी गाड़ी साइडला घेईपर्यंत भिजलोच. मग शेवटी तिथल्याच जवळच्या एका टपरी वर चहा घेतला. खुप बोलत होती ती आज, अगदी पहिल्यांदाच आम्ही एवढं बोलत असू. हातामधला चहा कधी गार झाला ते कळालच नाही, नुसतं तीचं बोलणं ऐकत रहावं असं वाटत होत, वाटत होत हा पाउस असाच सुरु राहू दे, तिचं बोलणं असंच सुरु राहू दे आणि आपण तिच्या डोळ्यात पहात रहावं... खुप गोड दिसली होती ती तेव्हा...

नुकताच ऑफिस मधुन आलो होतो. हातात कॉफीचा मग घेउन गच्चीमधे उभा होतो. सूर्य अस्ताला जात होता, आकाशात सगाळीकडे लाल, केशरी रंगाची उधळण सुरु होती. छान वारा सुटला होता, उन्हाळा संपत आल्याची एक सुखद जाणीव होती ती. मी त्यातलं जमेल तेवढं माझ्या कॅमेरा मधे साठवायचा प्रयत्न करत होतो. इतक्यात मागे कुणाची तरी चाहुल लागली म्हणून पाठीमागे पाहिलं तर ती उभी होती. अबोली रंगाचा पंजाबी ड्रेस, केसात चाफ्याचं फुल, आणि तेच मोठे टपोरे डोळे, त्यात आज काजळ लावलेलं. क्षणभर पाहतच राहिलो; तिनेच भानावर आणलं. हातामधलं "बोलगाणी" पुढे करत म्हणाली छान आहे. म्हंटलं मला वाटलंच होत तुला आवडेल. म्हणालो बस 2 मिनिट मी आलोच हा कॅमेरा ठेउन, कॉफी घेशील ना. होय म्हणाली. घरात कुणीच नव्हतं, आई-बाबा दादा कड़े गेले होते आणि आजी देवळात. मग मीच कॉफी केली  आणि कप घेउन परत गच्चीत आलो. माझ्या गच्चीत मी एक मस्त झोपाळा बांधून घेतला आहे. अगदी एखाद्या लहान मुलीसारखी त्यावर बसून झोके घेत होती, तिच्या शेजारी जाऊन बसलो. खुप वेळ झाला कुणीच काही बोलत नव्हत, मला तीचं असं शांत असणं आज सहन होत नव्हत. नेहमी बडबड करणारी ती, तिला कधीच असं शांत पहायची सवय नव्हती मला. मीच विचारल मग, "पुस्तक द्यायलाच आली होतीस न फ़क्त". म्हणाली,"हो, पुस्तक द्यायलाच". पुन्हा ५-१० मिनिटं शांतता. आकाशात आता ढग जमा होत होते  अन् वारयाचा वेग पण वाढला होता. म्हंटल चल घरात जाऊ पाऊस येइल असं दिसतय. माझा हात पकडून म्हणाली, 'बस रे पावसात भिजलास म्हणून काही बिघडत नाही, आणि लहान असताना तर तुला भिजायला आवडायच ना पावसात मग आता काय झालं". मी, "अगं पण उदया ऑफिस आहे सर्दी होइल, अन् हा काही श्रावणातला पाऊस नाही". ती काहीच बोलली नाही. पण मला देखिल तीचं मन मोडवेना. आज असं काहीतरी पहिल्यांदाच घडत होत. थोड्याच वेळात पाऊस सुरु झाला, पण दोघेही तसेच बसून होतो, अगदी नि:शद्ब, अजुनही तिने माझा हात तसाच धरून ठेवला होता... अचानक ती उठली आणि जायला निघाली, तिला थांब म्हणायला सुध्हा मला सुचत नव्हतं. अचानक दारापाशी गेल्यावर, तिचे ते टपोरे डोळे माझ्यावर रोखत तिने प्रश्न केला, "तू अजुनही माझ्या बोलण्याची वाट पाहत आहेस?". खूप वेगळी वाटली होती ती तेव्हा... 

Thursday, July 19, 2012

संवादाची भूक


कोणत्याही व्यक्तीला असते संवादाची भूक, अगदी जख्खड म्हातारयाला पण वाटतं कुणीतरी आपल्याशी दोन शब्द बोलावेत, अजुन धड चालता येत नसलेल्या बाळाला देखिल गरज वाटते रडून आपली भावना व्यक्त करण्याची, इतकंच काय पण ज्यांना बोलता येत नाही असे लोक देखिल हातवारयांच्या सहाय्याने करतातच की ही भूक पूर्ण...

Cast Away मधे नाही का Tom Hanks सोबत म्हणून त्याच्या vollyball ला विल्सन करत...

अगदी आदिम काळापासुनची गरज आहे ही आपली, म्हणून तर भाषेचा शोध लागला...

मी पण बोलतो, अगदी फार फार बोलतो... अगदी अनोळखी लोकांशी देखिल बोलतो, माझी मुलगी मला नेहमी ओरडत असते, म्हणते बाबा तू असा पटकन कसं काय कुणालाही मित्र करून घेतोस, एवढा पटकन एखाद्यावर विश्वास टाकणं बरं नाही, जरा वेळ घ्यावा एखाद्याशी मैत्री करायच्या आधी, घाई काय आहे. ती स्वताला introvert म्हणवते, म्हणते मला नाही ओपन उप होता येत पटकन... मग मी हसतो, कारण मला माहित आहे हे तिचे खोटे Excueses माझ्यासमोर नाही चालत, ती स्वताला कितीही introvert दाखवत असली तरी ती खरी तशी नाहीये, खरया तिला कुणी ओळखू नये म्हणून स्वतच स्वताला लपवत फिरते...

...आणि तसच पहायला गेल तर मी तरी अजुन काय करतो, बोलघेवडेपणाच्या कपड्यांखाली माझ्यातला एकाकी मी लपवून ठेवतो, कुणीही माझ्या  स्वला धक्का लावू नये म्हणून एक वेगळाच मी त्यांच्या समोर उभा करतो त्यांना देखिल त्याच्याशी खेळताना बरं वाटतं आणि मला खरा मी सुखरूप असल्याचं समाधान...

Saturday, July 7, 2012

I am Blank…





मला माहीत असलेल्या बहुतेक सगळ्या भावना माझ्या मनात भरून राहिल्या आहेत...  डोळ्यात येऊ पाहणारं पाणी नक्की सुखाचं आहे का वेदनेचं ? चेहरयावर उमटलेली स्मितरेषा नक्की कुठून आली आणि कशी? या विचारांनी माझं डोकं फुटेल का काय अस वाटत आहे, माझं ह्रदय आता कोणत्याही क्षणी बंद पडेल...


आज ती खूप आनंदी आहे... आणि मी?
माझ्याबद्दल मलाच खात्री नाही, मी खरंच सुखी आणि समाधानी आहे, का तसं वाटून घेण्याची सवय लागली आहे, माहित नाही.


मला ना खुप रडायचय, पण डोळ्यातलं पाणी पापण्यांपर्यंत येउन तिथूनच आत जातय, जणू काही डोळ्यावर अदृश्य अशी पट्टी बांधली आहे, बहुधा मी रडणच विसरलोय, मनातली दुख अन अश्रु इतके आत दाबून ठेवायची सवय झालिये की आता ठरवल तरी रडता येत नाहीये आणि हसण म्हणजे जणू काही त्या Batman मधल्या जोकर सारख कायमच चेहरयाला  चिकटलय...


हे सगळं निव्वळ तिच्या एका sms मुळे...
असं काय आहे त्या sms मधे? फ़क्त २ वाक्यं अन त्यात सुद्धा सगळे मिळून 8 शब्द...
"आता विमानात बसले आहे, आता थोड्याच वेळात भुर्र्रर्रर्रर :-)"


या क्षणाला तिच्या इतकं आनंदी दुसरं कुणी नसेल अन माझ्या एवढा confuse सुद्धा... ती आनंदी कारण ज्या गोष्टीचा ध्यास घेउन तिने जे कष्ट घेतले आज त्याचं फळ तिला मिळाल आहे... MIT मधे MS साठी Admission मिलणं आणि ते पण पूर्ण Scholarship वर हे नक्कीच कौतुकास्पद आहे... तिने घेतलेल्या अपार कष्टांची ती पावतीच आहे.


तस पहायला गेलं तर तिची-माझी ओळख काही फार जुनी नाही, गेल्या २-3 वर्षातली. अगदीच अनापेक्षित आणि अचानक, पण कुठल्या जन्माची लय जुळली माहित नाही अन् अनेकांना हेवा वाटावा अशी मैत्री झाली. माझ्यासाठी ती म्हणजे जणू कही "मैत्री" स्वत:च मानवी देह घेउन आली होती, तिच्यासाठी मी म्हणजे जणू मैत्रीचं जिवंत उदाहरण, तिला माझ्याबद्दल खुप अभिमान... दोघांना एकमेकांची एवढी ओळख झाली होती की संवाद साधायला कधी शब्दांची गरज पडलीच नाही. एकमेकांच्या मनातल्या भावना नुसत्या डोळ्यांनी टिपून घेऊ शकतो आम्ही, अगदी आजही... एखादा मिस कॉल किंवा How r u? सारखा msg  देखिल त्यात न लिहिलेले बरेच शब्द, न बोललेल्या बऱ्याच भावना आपोआप एकमेकांपर्यंत पोचवतो...


गेले काही दिवस तिच्यासोबत शॉपिंग करताना, तिचे पॅकिंग करून देताना, तिच्यासाठी विमानाची तिकिटं बुक करताना मनामधे ही जाणीव सतत जागी होती की आता नेहमीच्या भेटीगाठी नाहीत, विनाकारण मिसकॉल देणं नाही की फालतू msg नाहीत, वीक एंड्स च भटकण नाही, पावसातून भिजुन आल्यावर तिच्या हातची कॉफी नाही, रुसवे-फुगवे अन् भांडणं नाहीत, पण कधी एवढा भावुक नाही झालो, उलट तीचं सिलेक्शन झाल्याचं कळल्यावर आपणच तिला दगडूशेठ ला घेउन गेलो, अगदी काल तिला मुंबईच्या बसमध्यॆ बसवून देताना पण अगदी बिनधास्त होतो, मग आजच हा त्रास का? का असं वाटत आहे की तिला आपल्यापासून दूर जाऊ देऊ नयॆ, आत्ता ती ज्या विमानात बसली असॆल त्यातून तिला काहीही करून परत आणावं अन् मग तिला  आपल्यापासून दूर कुठेच जाऊ दॆऊ नयॆ...




........च्यायला आजचा दिवसच बेकार, सकाळी सकाळी दूध नासलं, मग ऑफिस मधे त्या टकल्याशी वाजलं, संध्याकाळी येताना गाड़ी पंक्चर, दोन सिगारेटची पाकिटं अन् ४ लार्ज घेउन पण पाय अजून जमिनीवरच  आणि लिहायला म्हणून कागद पेन घेतलं तर असलं काहीतरी लिहिल जातय...

Saturday, June 9, 2012

स्वताबद्दल खरंतर असं काय लिहायचं हा प्रश्नच पडला होता मला...
जर तुम्हाला तुमचं वर्णन एका शब्दात करायला सांगीतलं तर तुम्ही ते करू शकाल ?
मी करू शकेन, किमान इथून पुढे तरी नक्कीच...
आज विचार करताना एक मस्त शब्द सापडला, तसा तो आधीच ऐकला होता, "शापित गन्धर्व". पण मला हा शब्द माझ्याबाबतीत योग्य वाटेना. कारण त्या शब्दाला अपेक्षित एक दैवी देणगी "आवाजाची" माझ्याकडे नाही.
मी माझ्यासाठी एक दूसरा शब्द वापरेन, "शापित यक्ष". काही व्यक्ती जन्माला येतानाच आपल्या आयुष्याच ध्येय सोबत घेउन येतात. तर काही व्यक्तीना त्यांच ध्येय आयुष्य जगताना सापडत, ते शोधतात. पण काही व्यक्ती मात्र या जगात येतात, जन्म घेतात. आयुष्य जगायला सुरुवात करतात, ध्येय देखिल शोधायचा काही प्रमाणात प्रयत्न करतात, पण त्यांच्या हातातून बरेचदा उभं आयुष्य मुठीतून वाळू सटकावी तसं निसटून जातं. पण त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना आपल्या आयुष्याच ध्येय गवसत नाही.
माझी गणना मी या व्यक्तींमध्येच करेन, या असंख्य शापित लोकांपैकिच मी एक...
एक "शापित यक्ष" !!!