Monday, August 11, 2014

मी, ती आणि पाऊस... भाग-२

ए चल ना रे, प्लीज... माझ्यासाठी चल!” ती खूप विनवण्या करत होती. पण मी ठाम होतो. ऑफिस मधून दमून भागून आल्यावर मला खरतर कुठेही जायची इच्छा होत नव्हती. विशेषत: बाहेर पाऊस चालू असताना आईस्क्रीम खायला जायची तर नाहीच नाही. तिने सगळे मार्ग वापरून पहिले. लाडाने, प्रेमाने, चिडून पण माझा नकार ठाम आहे म्हंटल्यावर तिने हुकमी एक्का काढला. या डोळ्यांसमोर माझं काहीच चालत नाही. माझ्या तोंडून होकार कधी गेला ते मलादेखील समजल नाही.
आईस्क्रीम घेऊन झाल्यावर म्हणाली,”चल कुठेतरी फिरून येऊ. घरी जायची इच्छा होत नाहीये.” मग चांगल तासभर निरुद्देश भटकून परत घराकडे यायला निघालो. एव्हाना ट्राफिक कमी झालं असल तरी सिग्नल सुरु होते. एका सिग्नलला थांबलेलो असताना अचानक एका मुलाने गजरे घेणार का विचारलं, दे म्हणालो. त्या मंद सुगंधाने खूप छान वाटू लागलं. नेमकं त्याच वेळी रेडिओ वर रुना लैलाचं “रंजिशे हि सही लागलं....” दोघेही तल्लीन होऊन गाणं ऐकत होतो. त्याच तंद्रीत घरी पोचलो. दमला असशील न तू, फ्रेश होऊन ये मी तोवर कॉफी करते. पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी लगेच आत पळालो. शॉवर घेतल्यावर खूप हलकं वाटू लागल. मगापर्यंत माझ्याही नकळत कसलं तरी ओझं, दडपण मनावर होत.
कॉफी घेऊन गच्चीत गेलो, दोघेही शांत. ती शांतता त्या कॉफी पेक्षाही कडवट वाटत होती.वाटत होत काहीतरी चुकलय, काहीतरी हरवलंय. पण ते हरवलं आहे हेच आपल्याला अजून कळाल नाहीये. अचानक तिच्याकडे लक्ष गेलं तर तिच्या डोळ्यात अश्रू. मी विचारलं, “अग काय झालं अचानक तुला? आत्ताच तर तुझ्या मनासारख झालं सगळ आईस्क्रीम आणि मग नंतर फिरून आलो.” ती म्हणाली, ”बाबा! आईची आठवण येतेय रे...”. पायाच्या बोटाला जखम झालेली असावी आणि आपल्याच नादात चालताना अचानक तिथेच ठेच लागून ती कळ थेट मेंदूत जावी, अस काहीतरी झालं. सकाळपासूनची हुरहूर, एक विचित्र प्रकारची अस्वस्थता, चिडचिड या सगळ्याच कोड अचानक सुटल.शांतपणे तिला जवळ घेऊन थोपटत राहिलो.
उणीपुरी २० वर्ष होत आली तरी अजूनही सगळं काल-परवा सारखाच वाटत होत. तिच्या बरोबर जगलेला प्रत्येक क्षण आजही जसाच्या तसा स्मरणात आहे. तिचं हसणं, तिचं रुसणं, तिचा राग, तिचं प्रेम आणि तिचे डोळे. वाटतं आत्ता सुद्ध्या ती तशीच त्या अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे पाहत आहे माझ्या समोर बसून. अजूनही आठवते ती संध्याकाळ, ती कॉफी, तिचा तो स्पर्श आणि तिचा तो प्रश्न, “तू अजूनही माझ्या बोलण्याची वाट पाहत आहेस?”

No comments:

Post a Comment