Tuesday, July 31, 2012

मी, ती आणि पाउस...

मी असेन तेव्हा ७-८ वर्षांचा आई बरोबर शाळेतुन घरी येत होतो. फार मोठा पाउस नसला तरी अंग भिजण्याएवढा नक्की होता. एका हाताने छत्री आणि दुसरया हाताने मला पकडून ठेवताना तिची होणारी  धांदल सहज दिसत होती. पण मला मात्र पावसात खेळायचं होतं, माझी तीच मस्ती सुरु असताना मी एक छानपैकी दंडवत घातला रस्त्यात, रस्त्यामधला बराचसा चिखल आता मझ्या अंगावर अणि कपड्यांवर आला होता आणि माझं ते ध्यान बघून टपोरया डोळ्यांची, दोन वेण्या घातलेली एक मुलगी हसत होती. भरिस भर म्हणून आईच्या हातचे २ रट्टे पण बसले पाठीत. झालेला तो प्रचंड अपमान सहन करत, पण डोळ्यातून पाणी न येऊ देण्याचे खुप कष्ट घेत कसंबसं घर गाठलं होतं... खुप दुष्ट वाटली होती ती तेव्हा...

आज शिकवणीला जाताना खुप भीती वाटत होती, एकतर उशीर झालाच होता आणि त्यात गृहपाठ पूर्ण नव्हता. तरी नशीब आज आजी ओरडली दादाला, म्हणून त्याने त्याची सायकल तरी दिली होती. नाहीतर त्याची सायकल चालवायला मिळणं तर दूर हात लावायला पण द्यायचा नाही. कसाबसा अर्ध्या रस्त्यात पोचलो असेल तेवढ्यात पाउस सुरु झाला, कशीतरी सायकल बाजूला घेतली आणि एका घराच्या आडोशाला उभा राहिलो. २-४ मिनिटं झाली असतील तेवढ्यात ती येताना दिसली. अगदी तशीच टपोर्या डोळ्यांची, दोन वेन्य घालणारी... म्हणाली, "चल माझ्याकड़े छत्री आहे एकत्रच जाऊ". एकतर उशीर झाला होता आणि कुणी मित्र नव्हते म्हणून तयार झालो मी जायला. नाहीतर त्यांना निमित्तच मिळालं असत चिडवायला. कुठलाही मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलले की लगेच चिडवणं चालू... आपल्याला नाही आवडत असलं काही. तिच्याशी काय बोलायचं हा एक प्रश्नच होता, तेवढ्यात शेजारून जाणारया गाडीने खड्यामधे साचलेलं पाणी आमच्या अंगावर उडवलं आणि तंद्री मोडली आणि काही कळायच्या आत ती गाड़ी निघून पण गेली होती... मी तिच्याकडे पहिलं तर तिच्या डोळ्यात एकूण एक ढग जमा होऊन कोणत्याही क्षणी पाउस सुरु होइल अशी अवस्था. मला तर सुचेचना काय बोलावं, काहीतरी बोलायचं म्हणून म्हणालो, "अगं कपडे धुतले की जाईल डाग". माझ्या त्या वाक्यासरशी तिचा हुंदका बाहेर पडला, म्हणाली, "आज माझा वाढदिवस आहे म्हणून नविन ड्रेस शिवून आणला होता कालच आणि आजच तो ख़राब झाला"... खुप हळवी वाटली होती ती तेव्हा...

त्या दिवशी सकाळपासुनच देव बहुतेक माझ्या मागे हात धुवून लागला होता. आता मला सांगा कॉलेजमधे कुणी अभ्यासाच्या वह्या,पुस्तकं, आय-कार्ड अशा गोष्टि नेतं का? आणि किमान सिनियर कॉलेज मधे तर नक्कीच नाही. तर झालं अस की त्या दिवशी नेमके गेट वर प्रिंसिपल उभे आणि प्रत्येकाचे आय-कार्ड तपासत होते. कॉलेज मधे जायचा तर प्रश्नच नव्हता, मग राहता राहिलं कॉर्नर वरच्या अण्णाचं हॉटेल, पहिलं तर सगळा ग्रुप तिकडेच पडीक, टेबल वर बसून टाइमपास करत दिवस घालवायचा नव्हता म्हणून पेटपूजा करता करता पिक्चरचा प्लान ठरला, पण त्याला अजुन खुप वेळ होता म्हणून तिथेच टी-पी करत बसलो होतो. तेवढ्यात वर्गातला एक स्कॉलर तिथे आला ते माझ्या उरलेल्या दिवसाची पण वाट लावायला. म्हणाला सरांनी स्टाफरूम मधे बोलावलं आहे, जर्नल सबमिट केलं नाही म्हणून. साला म्हणजे हा माझे ४ तास खाणार पुढचे, कुठला पिक्चर आणि कसलं काय, पुढचे ३-३.३० तास आधि त्यांच लेक्चर ऐकण्यात अणि नंतर बधिर झालेल डोकं ठिकाणावर आणण्यात गेले. सगळ्या मित्रांनी नावाला जागुन टांग मारली होती अणि पिक्चरला गेले होते. त्यापैकी कुणी परत इकडे फिरकेल अशी शक्यता पण नव्हती. खुप भूक लागली होती म्हणून परत अण्णाच्या हॉटेल वर आलो तर ते पण बंद झालं होतं. बाइक काढून घरी निघालो होतो तेव्हढ्यात बस स्टॉप वर ती दिसली. म्हंटल चल मी पण घरीच निघालोय सोडतो तुला... विचारलं कॉफी प्यायची का? तर चालेल म्हणाली. चला तितकीच कुणाची तरी सोबत. तसंही मला एकट्याला बसून खायला फारसं आवडत नाही. पण पुढच्याच मिनिटाला जो पाउस चालू झाला ते अगदी धो धो कोसळायला लागला, कशी-बशी गाड़ी साइडला घेईपर्यंत भिजलोच. मग शेवटी तिथल्याच जवळच्या एका टपरी वर चहा घेतला. खुप बोलत होती ती आज, अगदी पहिल्यांदाच आम्ही एवढं बोलत असू. हातामधला चहा कधी गार झाला ते कळालच नाही, नुसतं तीचं बोलणं ऐकत रहावं असं वाटत होत, वाटत होत हा पाउस असाच सुरु राहू दे, तिचं बोलणं असंच सुरु राहू दे आणि आपण तिच्या डोळ्यात पहात रहावं... खुप गोड दिसली होती ती तेव्हा...

नुकताच ऑफिस मधुन आलो होतो. हातात कॉफीचा मग घेउन गच्चीमधे उभा होतो. सूर्य अस्ताला जात होता, आकाशात सगाळीकडे लाल, केशरी रंगाची उधळण सुरु होती. छान वारा सुटला होता, उन्हाळा संपत आल्याची एक सुखद जाणीव होती ती. मी त्यातलं जमेल तेवढं माझ्या कॅमेरा मधे साठवायचा प्रयत्न करत होतो. इतक्यात मागे कुणाची तरी चाहुल लागली म्हणून पाठीमागे पाहिलं तर ती उभी होती. अबोली रंगाचा पंजाबी ड्रेस, केसात चाफ्याचं फुल, आणि तेच मोठे टपोरे डोळे, त्यात आज काजळ लावलेलं. क्षणभर पाहतच राहिलो; तिनेच भानावर आणलं. हातामधलं "बोलगाणी" पुढे करत म्हणाली छान आहे. म्हंटलं मला वाटलंच होत तुला आवडेल. म्हणालो बस 2 मिनिट मी आलोच हा कॅमेरा ठेउन, कॉफी घेशील ना. होय म्हणाली. घरात कुणीच नव्हतं, आई-बाबा दादा कड़े गेले होते आणि आजी देवळात. मग मीच कॉफी केली  आणि कप घेउन परत गच्चीत आलो. माझ्या गच्चीत मी एक मस्त झोपाळा बांधून घेतला आहे. अगदी एखाद्या लहान मुलीसारखी त्यावर बसून झोके घेत होती, तिच्या शेजारी जाऊन बसलो. खुप वेळ झाला कुणीच काही बोलत नव्हत, मला तीचं असं शांत असणं आज सहन होत नव्हत. नेहमी बडबड करणारी ती, तिला कधीच असं शांत पहायची सवय नव्हती मला. मीच विचारल मग, "पुस्तक द्यायलाच आली होतीस न फ़क्त". म्हणाली,"हो, पुस्तक द्यायलाच". पुन्हा ५-१० मिनिटं शांतता. आकाशात आता ढग जमा होत होते  अन् वारयाचा वेग पण वाढला होता. म्हंटल चल घरात जाऊ पाऊस येइल असं दिसतय. माझा हात पकडून म्हणाली, 'बस रे पावसात भिजलास म्हणून काही बिघडत नाही, आणि लहान असताना तर तुला भिजायला आवडायच ना पावसात मग आता काय झालं". मी, "अगं पण उदया ऑफिस आहे सर्दी होइल, अन् हा काही श्रावणातला पाऊस नाही". ती काहीच बोलली नाही. पण मला देखिल तीचं मन मोडवेना. आज असं काहीतरी पहिल्यांदाच घडत होत. थोड्याच वेळात पाऊस सुरु झाला, पण दोघेही तसेच बसून होतो, अगदी नि:शद्ब, अजुनही तिने माझा हात तसाच धरून ठेवला होता... अचानक ती उठली आणि जायला निघाली, तिला थांब म्हणायला सुध्हा मला सुचत नव्हतं. अचानक दारापाशी गेल्यावर, तिचे ते टपोरे डोळे माझ्यावर रोखत तिने प्रश्न केला, "तू अजुनही माझ्या बोलण्याची वाट पाहत आहेस?". खूप वेगळी वाटली होती ती तेव्हा... 

No comments:

Post a Comment